top of page
  • Writer's pictureKapil Pund

मिसळ Chronicles

नो ऑफेन्स, पण पुण्यात मिसळ हा प्रकार फेल आहे. सगळीकडे ट्राय करून झालंय. काही एकदम पाणचट किंवा गोड आणि अगदी गरजे पेक्षा तिखटजाळ! ठीक आहे जे विकलं जातं तेच पिकणार, पण मिसळ बिना मटकीची कशी बनू शकते हे मला पडलेलं कोडं आहे.

आणि मिसळ मागितली आणि फक्त ‌मिसळ मिळाली असंही फार कमीच वेळा होतं! त्यात कशाला पाहिजे गुलाबजाम आणि जिलब्या ? ठेवा ना सिम्पल गोष्टीला सिम्पल.

असो, ज्याची त्याची आवड.

मिसळ कोल्हापूर नाशिक पुणे किंवा अजून कुठली बेस्ट असते या वादात नाही पडायचं मला पण मी नगरचा आहे. माझ्या गावात जी मिसळ मिळते, माझ्यासाठी मिसळीचा बेंचमार्क तोच आहे. खाताना दुसरं काही कमी पडतंय असं वाटू नये, कांदा किंवा कट एक्सट्रा मागितला तर दुकानदाराने ७/१२ मागितल्यासारखं तोंड करू नये, मिसळीमधे मटकी शोधावी लागू नये या अपेक्षा अगदी माफक नाहीत का ? आणि मुळात मटकी म्हणजे काय केशर आहे का त्यात असा हिमटेपणा करायला ?

आणि प्लीज़... जशी व्हेज बिर्याणी म्हणजे अंधश्रद्धा आहे तसंच मटार उसळ वगैरे प्रकार म्हणजे अगदी दैवनिंदा आहे.

प्रॉडक्ट चांगलं असेल तर त्याला फार मार्केटींगची गरज पडत नाही असं म्हणतात. त्यामुळे कदाचित माझ्या गावाकडे मिसळ थाळी , चुलीवरची मिसळ , बार्बेक्यू मिसळ , निखारा मिसळ , तंदूर मिसळ (किती घाण वाटतंय ऐकायला पण) "स्पेशल मिसळ" इत्यादि प्रकार आढळतही नाहीत.


२०१९ मध्ये माझ्या काही मित्रांनी एक चहाचा स्टाँल चालू केला. मी चहा पीत नाही पण मी गेलो होतो

स्टाँलच्या ओपनींगला..


फास्ट फॉरवर्ड २०२२, आजचा दिवस.

कालच्या "जाेरात" बार्बेक्यू मिसळ (Pun intended) च्या धक्क्यातून तसा मी पूर्णत: बाहेर आलेलो नव्हतो. ती मिसळ चांगली की वाईट हे मी सांगू शकत नाही, पण नाशिक ची मिसळ जर अशी असणार असेल तर नाशिककरांनी "बेस्ट मिसळ कोणती" या चर्चेत अजिबात भाग घेऊ नये. पुण्या बद्दल मला बोलायचं नाहीये आणि कोल्हापूर वाल्यांनी यावरून टोल नाके बंद पाडले तर मी त्यांना दोष देणार नाही.

असो, कालंच असा फज्जा उडाला असल्यामुळे आज मला कोणत्याही परिस्थितीत चांगली मिसळ हवी होती, माझ्या अंगात कूकिंग स्किल आहे तसं, पण कंटाळा त्यापेक्षा जास्त आहे त्यामुळे घरी उद्योग करण्याचा प्रश्नच नव्हता. याच मिसळ overthinking मुळे मला माझ्या मित्राच्या स्टाँलची आठवण झाली. गेल्या दोन वर्षांत त्यांनी चहा वरून मिसळीवर झेप घेतलेली होती आणि मेन म्हणजे तिथे मिसळ फेल गेली तरी वाईट वाटणार नव्हतं! याची कारणं २ :

एक म्हणजे जुने मित्र खूप दिवसांनी भेटतील आणि दुसरं म्हणजे

फुकट ते मुळासकट .. कारण ते पैसे मागणार नाहीत आणि मी देणार नाही ..


मी माझ्या दोन मित्रांना पण घेऊन गेलो. तेवढीच आपली हवा उगाच सांगायला भारी वाटतं मित्रांचं हॉटेल आहे..


आज वीकडे असल्यामुळे गर्दी जवळजवळ नव्हतीच.. पण माझे मित्र पण नव्हते.. सगळे आपल्या कामात बिज़ी असतील.

गेल्यागेल्या मी पहिला डब्बा उघडून मुठीत बसतील तेवढे शेंगादाण्याचे लाडू बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. डब्यात अडकलेली मूठ बाहेर काढता काढता ३ मिसळची ऑर्डर दिली आणि मी मालकाचा मित्र आहे हे इंडिरेक्टली सांगून पण टाकलं.

पुढच्या १० मिनिटात मिसळ आली १५ मिनिटात आम्ही संपवली पण आणि पैसे देऊन निघालो पण. अगदी पाहिजे तशी.. ना अती तिखट ना मिळमिळीत .. परफेक्ट.. म्हणजे मिसळ युनिव्हर्स मधली ब्लॅक विडो म्हणलं तरी चालेल.. उगाच नको तो शो ऑफ नाही.. टाकायचं म्हणून चीज-बटर किंवा तत्सम काहीही टाकलेलं नाही.. भरपूर मटकी.. चांगली शेव आणि शिळे नसलेले पाव.. अजून काय असतं मिसळ ‌म्हणजे तरी... जे खूप जणांना नाहीये जमलेलं ते IT इंजिनीअर पोरांनी करून दाखवलंय.. इंजिनीअर प्रॉब्लेम सॉल्व्हर असतात हे उगाच म्हणत नाहीत..


तृप्त मनाने घरी येताना मित्रांना कॉल केला तेव्हा कळंल ही रेसिपी आमच्या संदीप उर्फ "मामा" नेच फायनल केलेली आहे. नो पॉईंट्स फॉर गेसींग, तो पण नगर जिल्ह्यातलाच आहे.


शेवटी चवीतले प्रेफरन्सेस आणि आवडी ह्या व्यक्तीगणिक बदलत असतात, पण तरी.. तुम्ही सगळ्यांनी या ठिकाणी नक्की जायला पाहिजे असं मला वाटतं..

ठिकाण : सरकार स्पेशल मिसळ,चेल्लाराम हॉस्पिटल जवळ , बावधन

गूगल मॅप लिंक : https://goo.gl/maps/tH4YXiYZBdwqhE876

शक्यतो वीकेंडला जा..

मिसळ खा... मिसळ नाही आवडली तरी पोरं नक्की आवडतील!


ता.क : या ब्लॉगमधून कोणावरही टीका करण्याचा हेतू नाही. आफ्टर आॅल -


चमन में इख़्तिलात-ए-रंग-ओ-बू से बात बनती है ,

हम ही हम हैं तो क्या हम हैं , तुम ही तुम हो तो क्या तुम हो ?।। ईति:श्रीखाद्यपुराणेक्षुधानाशनंनाममहामिसळस्तोत्रसंपूर्णम ।।

36 views0 comments

Σχόλια


bottom of page